“वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला“
वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग – गवळणी म्हणत दान मागणारा लोककलाकार आहे. वासुदेवाचा गौरव एक समाज प्रबोधन करणारी संस्था म्हणूनही केला जातो. वासुदेव आपल्या गीतातून तत्त्वज्ञान सांगतो. आपण चागंले काम करीत रहावे आणि आयुष्यात मिळणार-या चांगल्या वाईट अनुभव ईश्वरावर सोपवावे अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी वासुदेवाच्या मदतीने मावळ्यांच्या घरी निरोप दिलेले आहेत. तसेच वासुदेवाचा उपयोग करून शत्रूंच्या बातम्याही मिळवल्या आहेत. वासुदेवांची परंपरा मराठी संस्कृतीतील सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी आहे, असा अंदाज लावला जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या साहित्यात वासुदेव आढळतात. परंतु एकनाथ महाराजांनी त्याला आणखी प्रसिद्धीच्या दिसेल आणले.
डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,हातात तांब्याचे कडे, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळ, गंधाचे टिळे कपाळावर व कंठावर. अशा वेष वासुदेवाचा असतो.
दिवाळी-दसरा सणाच्या काळात मोर पिसारा फुलवून नाचत असतात. वासुदेव आपली टोपी मोराच्या पिसाऱ्याचा वापर करून बनवतात. याशिवाय या टोपीत बांबूच्या काठ्या, सुती धागा, मोर पिसारे, तुळशीची माळ, भगवा कपडा अशा वस्तूहू वापरल्या जातात.
परंतु आता या धावपळीचा युगात वासुदेव हि संकल्पना नाहीशी होताना पाहायला मिळत आहे.